पुणे : सौर विद्युत प्रकल्प उभारण्यात आल्याने पुणे शहर तहसील कार्यालयाची आता दरमहा १ लाख ३० हजार रूपयांची बचत होणार आहे. प्रतिदिवशी ४० युनिट वीजनिर्मिती होणार आहे. तहसील कार्यालयास एका वर्षात १२ हजार युनिट वीज उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पुणे शहर तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दिली.
शहर तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीवर १० किलोवॅट क्षमतेचा सौर विद्युत प्रकल्प नुकताच उभारण्यात आला आहे. यामध्ये ३३५ वॅट क्षमतेचे एकूण ३० सौलर पॅनल, इन्व्हर्टर आणि बॅटरी यांचा समावेश आहे. महाऊर्जा या शासकीय संस्थेने १०० टक्के अनुदानावर हा प्रकल्प उभारला आहे. यासाठी महाऊर्जेचे अपर महासंचालक सूरज वाघमारे यांनी प्रोत्साहन दिले.
शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा, असे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जा वापरास चालणा द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या कार्बन उत्सर्जनामध्ये घट होण्यास देखील मदत होणार आहे.