पुणे : शहरात मंगळवारी पुन्हा नव्या कोरोनाबाधितांची संख्या शंभरीपर्यंत पोहोचली असून, दिवसभरात झालेल्या ३ हजार ९४७ जणांच्या तपासणीमध्ये ९६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी २.४३ टक्के आहे. गेल्या आठ दिवसात तिसऱ्यांदा तपासणीच्या तुलनेत बाधितांची दिवसाची टक्केवारी २ टक्क्यांच्या पुढे गेली आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी चारपर्यंत ४६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज ४ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ८०८ झाली आहे.
आजपर्यंत ३६ लाख २४ हजार ३८२ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ५ हजार ५०७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ९५ हजार ६१३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरात १०४ कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर असून, ६१ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरात ९ हजार ८६ जणांचा बळी गेला आहे.