पुणे : रविवारी स्वच्छता कामगार सुटीवर असल्याने शहरातील साफसफाईचे काम बंद राहून शहर अस्वच्छ दिसण्याचा प्रकार आता यापुढे होणार नाही. प्रशासनाने कामगारांच्या सुट्ट्यांचे नियोजन करण्यास घनकचरा व्यवस्थापन विभागाला सांगितले असून त्यानुसार आता काही कामगार रविवारीही स्वच्छतेचे काम करतील. रविवारी सर्वच स्वच्छता कामगारांची साप्ताहिक सुटी असल्याने शहर स्वच्छतेच्या कामालाही सुटी मिळून शहरात सगळीकडे अस्वच्छता दिसत असे. सुटीचा दिवस असल्याने घराघरांमधून स्वच्छता केली जाऊन तो कचरा रस्त्यावर येत असे. रस्त्यावरचे कचऱ्याचे कंटेनर मात्र उचलले जात नसत. त्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचत. शहराची वाटचाल ‘स्मार्ट सिटी’कडे होत असताना रविवारचे हे चित्र मात्र त्याच्याशी अत्यंत विसंगत असे असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्या निदर्शनास आणले. त्यांनी याची त्वरित दखल घेत घनकचरा व्यवस्थापन विभागाला त्यावर उपाय करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे आता हा कामगारांच्या सुट्ट्यांचे नियोजन करण्याचा उपाय शोधण्यात आला आहे.यापुढे स्वच्छतेचे काम करणाऱ्यांच्या सुट्ट्या बदलत्या दिवशी असतील. त्यामुळे रविवारीही सुमारे ८० टक्के कामगार उपस्थित असतील. त्यांना कामाचेही नियोजन करून देण्यात येणार आहे. जास्त कचरा साचणाऱ्या ठिकाणी जादा कामगार नियुक्त करण्यात येतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. हे सर्व नियोजन करून त्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्याला आयुक्तांची संमती घेतली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.
रविवारीही ‘पुणे स्वच्छ’
By admin | Published: November 21, 2015 4:07 AM