पुणे : निवडणूक आयाेगाने निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. या आचारसंहितेचे सर्वच विभाग प्रमुखांनी काटेकाेरपणे पालन करुन प्रभावी अंमलबजावणी करावी असे आदेश पुण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात साेमवारी सर्व विभागप्रमुख, नोडल अधिकारी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, रेल्वे, बँकाचे प्रतिनिधी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी राम बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्यासह सहायक निवडणूक अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी राम म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घेण्याकरीता आचारसंहितेचा सखोल अभ्यास करावा. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सी-व्हीजल या मोबाईल ॲपचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने दिलेल्या विविध सुविधा व सुचनांचेही प्रत्येकाने पालन करुन ही निवडणूक सर्वांनी एकत्रित मिळून शांततेत पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.
विधानसभा निवडणुकीची अंमलबजावणी करतांना आदर्श आचार संहितेचे उल्लघंन होणार नाही, याची काळजी घेवून आचार संहितेचे पालन करावे. तसेच निवडणूकीदरम्यान राजकीय पक्षांनी आपले प्रचार कार्य करतांना प्रचाराच्या विविध माध्यमाचा वापर करण्यापूर्वी ते प्रमाणित करुन घ्यावे. प्रचारावर होणाऱ्या सर्व खर्चाचे विवरण सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले.