Pune Collector Transfer : जितेंद्र डुडी नवे जिल्हाधिकारी; गजानन पाटील झेडपीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:45 IST2025-01-03T11:44:25+5:302025-01-03T11:45:21+5:30
गेल्या वर्षीच्या झालेल्या निवडणुकांमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून पुणे विभागात डुडी यांना सन्मानित करण्यात आले

Pune Collector Transfer : जितेंद्र डुडी नवे जिल्हाधिकारी; गजानन पाटील झेडपीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी
पुणे : राज्य सरकारने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना पदोन्नती देत सचिव दर्जा बहाल केला असून, त्यांची आता जमाबंदी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारीपद हे सहसचिव दर्जाचे असून, डुडी यांची नियुक्ती करताना हे पद अवनत करून उपसचिव दर्जाचे करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची साताऱ्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून, अतिरिक्त जिल्हाधिकारी गजानन पाटील यांची करण्यात आली आहे.
डुडी यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार गुरुवारी जितेंद्र डुडी सायंकाळी (दि. २) दिवसे यांच्याकडून स्वीकारला. डुडी हे २०१६ च्या आयएएस तुकडीतील अधिकारी असून त्यांनी राजस्थान टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून बी. टेक.ची (संगणकशास्त्र) पदवी घेतली आहे. त्यांनी २०१७ मध्ये झारखंड जिल्ह्यातील धनबाद येथे सहायक जिल्हाधिकारी, तर २०१८-१९ मध्ये सिमरिया जिल्ह्यातही काम केले आहे.
त्यांनी २०१९ मध्ये महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून काम केल्यानंतर २०१९-२० मध्ये पुणे जिल्ह्यातील मंचर घोडेगाव येथे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर सांगलीच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर गेल्या दीड वर्षापासून डुडी हे सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. गेल्या वर्षीच्या झालेल्या निवडणुकांमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून पुणे विभागात डुडी यांना सन्मानित करण्यात आले होते.
संतोष पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार सायंकाळी सोडून तो अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्याकडे दिला होता. त्यानंतर अवघ्या तासाभरातच गजानन पाटील यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. राज्य सरकारच्या महसूल सेवेतील असलेले गजानन पाटील यांनी पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी म्हणूनही ते पुण्यात कार्यरत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी मंत्रालयात प्रदीर्घ कारकीर्द केली. गुरुवारी त्यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
दिवसे यांची गेल्या वर्षी ८ फेब्रुवारीला पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हाधिकारीपदी दिवसे हे प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणामुळे देशभर चर्चेत आले होते. त्यांच्या ११ महिन्यांच्या कार्यकाळात लोकसभा व विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या. राज्य सरकारने दिवसे यांना पदोन्नती देत रिक्त असलेल्या राज्याच्या जमाबंदी आयुक्त तसेच भूमी अभिलेख विभागाच्या संचालकपदी नियुक्ती केली आली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती डुडी यांच्या जागी करण्यात आली आहे; तर मंत्रालयातील अतिरिक्त जिल्हाधिकारी गजानन पाटील यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. तत्पूर्वी संतोष पाटील यांनी आपला कार्यभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्याकडे सोपविला आहे.