पुणे : गंगा नदीप्रदूषणमुक्त करावी आणि तिथे कोणतेही हानीकारक प्रकल्प होऊ नये या मागणीसाठी १११ दिवस पर्यावरणतज्ज्ञ प्रा. जी. डी. अग्रवाल यांनी उपोषण केले होते. या उपोषणातच अग्रवाल यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे हे बलिदान व्यर्थ न जाऊ देता ही साखळी सुरू ठेवण्यासाठी पुण्यातील पर्यावरणप्रेमींनी साखळी उपोषण सुरू केले. त्याला आज (दि.५) १११ दिवस झाले आहेत. त्यामुळे आज देखील सर्व १११ जणांनी दिवसभराचे उपोषण केले.
प्रा. जी. डी. अग्रवाल (स्वामी सानंद) यांना श्रध्दांजली म्हणून पुण्यातील पर्यावरणप्रेमींनी हे साखळी उपोषण सुरू केले. हे उपोषण चार-पाच दिवस चालेल आणि बंद होईल, असे वाटले होते. परंतु, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि मार्च महिन्यापर्यंत नागरिकांनी उपोषणासाठी नोंदणी केलेली आहे. दररोज एक जण जिथे आहे तिथे उपोषण करीत आहेत. यामध्ये राज्यातील अनेक ठिकाणचे नागरिक सहभागी झाले आहेत. तसेच शाळेतील विद्यार्थीही सहभाग घेत आहेत, अशी माहिती निरंजन उपासनी यांनी दिली. त्यांनीच या उपोषणाच संकल्पना सुरू केली.
याविषयी उपासनी म्हणाले, अग्रवाल यांनी उपोषण केले. परंतु, त्याची माहिती आम्हाला नव्हती. ते गेल्यानंतर अनेकांना समजले की ते नदीसाठी लढत होते. त्यामुळे आम्हाला ते खूप मनाला लागले. तेव्हा मी नदीसाठी एक दिवस उपोषण करण्याचे ठरविले. त्यानंतर माझे मित्र आणि इतर सहकारी सहभागी झाले आहेत. नदी ही शहराची जीवनवाहिनी असते. परंतु, आपल्या पुण्यातील मुठा अत्यंत वाईट अवस्थेत आहे. तिची अवस्था पाहून मनाला खूप वाईट वाटते. ती स्वच्छ करण्यासाठी लोकचळवळ हवी. त्याशिवाय ती स्वच्छ होणार नाही.’’ वन्यजीव संशोधक धर्मराज पाटील म्हणाले, मुठा नदीपात्रात प्रचंड घाण आहे. त्यामुळे येथे शेकाट्या हे पक्षी पाहायला मिळतात. ते गटारातच दिसतात. नागरिक नदीत कचरा टाकत आहेत. तसेच सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे मुठा प्रदूषित होत आहे. त्यासाठी नागरिकांनीच पुढे येऊन पुढाकार घेतला पाहिजे.’’