पुणे: काल लागलेल्या सीबीएसई निकालावरून कोथरूडमधील पी.जोग शाळेत गोंधळ उडाला आहे. कालच्या निकालावरून पालक आक्रमक झाले आहेत. या शाळेने दहावीचा सीबीएसई निकाल फक्त एकाच सेमीस्टरवरून लावल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे पालकांनी सांगितले.
शाळेने केवळ सेमिस्टरवर दहावीचा निकाल लावला आहे. अनेक विद्यार्थ्यांना शाळेने नापास केलं आहे. या चुकीच्या निकालामुळे आमची मुले घाबरलेली आहेत. त्यांना काय झालं तर याची जबाबदारी कोण घेणार असंही पालक म्हणाले.
शाळेने पालकांना विश्वासात घेतले गेले नाही. शाळेच्या प्राचार्यांनीही आम्हाला खोटी माहिती दिली. पहिल्या सेमिस्टरची परीक्षा शाळेने घेतली नव्हती. पहिल्या सेमिस्टरपर्यंत शाळेला सीबीएसईची मान्यता नव्हती. त्याबद्दल शाळेने ५ लाखांचा दंडही भरला होता. शाळेने परीक्षा न घेता हा निकाल लावल्याने आमच्या मुलांचे मोठे नुकसान झाल्याचे पालकांनी सांगितले.
एक विद्यार्थिनी बोलताना म्हणाली, आम्हाला पहिल्या सेमिस्टरचे हॉल तिकीटच आले नव्हते. आमची परीक्षा झाली नाही. पहिल्या सेमिस्टरचे कमी गुण मिळाल्याने आमचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याबद्दल शाळेसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून काहीही उत्तर मिळाले नाही.