अजूनही निरोप नाही...! पुणे काँग्रेसला बंटी पाटलांची तर ग्रामीण, पीसीएमसीला गुडघे पाटलांची प्रतिक्षा
By राजू इनामदार | Updated: April 3, 2025 15:39 IST2025-04-03T15:38:06+5:302025-04-03T15:39:59+5:30
पुण्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, जुने निष्ठावान यांची भेट घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून राजकीय अहवाल तयार करण्याची जबाबदारी या दोघांवर देण्यात आली आहे

अजूनही निरोप नाही...! पुणे काँग्रेसला बंटी पाटलांची तर ग्रामीण, पीसीएमसीला गुडघे पाटलांची प्रतिक्षा
पुणे: शहरातील काँग्रेसजनांना माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची प्रतिक्षा आहे. अशीच प्रतिक्षा पुणे ग्रामीण व पिंपरी-चिंचवड काँग्रेसजन नागपूरचे प्रफुल्ल गुडघे पाटील यांची करत आहेत. हे दोघेही प्रदेश काँग्रेसने नियुक्त केलेले निरीक्षक असून कार्यक्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, जुने निष्ठावान यांची भेट घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून राजकीय अहवाल तयार करण्याची जबाबदारी या निरीक्षकांवर देण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील सर्व जिल्हे व शहरांसाठी अशी मोहीम राबवली आहे. २८ मार्चला मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांनी हे निरीक्षक नियुक्त केले. त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आता इतके दिवस झाल्यानंतरही अजून बंटी पाटील किंवा गुडघे पाटील यांच्याकडून काहीच निरोप येत नसल्याने काँग्रेसजनांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. अन्य जिल्ह्यांमधील निरीक्षकांचे दौरे सुरू झाले. त्यातील काहींनी तर दौरा पूर्ण करून अहवाल तयार करण्यास सुरूवातही केली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड तसेच ग्रामीणमध्ये मात्र याचा मागमूसही लागायला तयार नाही.
शहर काँग्रेसला गेल्या सलग तीन पंचवार्षिकमध्ये लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागला आहे. याला अपवाद कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा. त्यात पक्षाला विजय मिळाला, मात्र विजय मिळालेले रविंद्र धंगेकर हे आमदार पुढे लोकसभेला व नंतर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत पराभूत झाले. आता तर त्यांनी काँग्रेसला सोडलेही. गटबाजीनेच त्यांचा घात केला व त्यातूनच त्रस्त होऊन ते दुसऱ्या पक्षात गेले असे आता बोलले जात आहे, तर पदाधिकाऱी त्याचा इन्कार करत, त्यांच्या गैरव्यवहारांना संरक्षण मिळावे यासाठीच ते सत्तेत गेल्याचे सांगतात.
पुणे ग्रामीण व पिंपरी-चिंचवड काँग्रेसची राजकीय अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. ग्रामीणमध्ये पक्षाकडे पुरंदर व भोर अशा दोन विधानसभा होत्या. या दोन्ही विधानसभांमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. पिंपरी-चिंचवडमध्ये तर पक्षाचे अस्तित्वही शिल्लक राहिलेले नाही. पुणे शहर व पिंपरी-चिंचवड इथे महापालिकेच्या निवडणूकाच सलग ३ वर्षे झालेल्या नाहीत. तिथेही पक्षाचे अस्तित्व नगण्यच आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात पक्षाकडे एकही लोकनियुक्त असे पद नाही.
यात बदल व्हावा, काही ठिकाणी खांदेपालट व्हावा, तरुणांना संधी दिली जावी, पक्षाने लोकाभिमूख कार्यक्रम राबवावेत अशी पक्षाच्या तळातील कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षांनी नेमलेल्या निरीक्षक पद्धतीचे सर्वांकडून स्वागत करण्यात आले. मनातील तगमग त्यांच्याकडे बोलता येईल, त्यांना काही सांगता येईल असे पक्षाच्या निष्ठावान पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वाटते आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून निरीक्षकांची प्रतिक्षा केली जात आहे, मात्र अजून तरी त्यांना या निरीक्षकांच्या दौऱ्याविषयी काहीही समजलेले नाही.