पुणे : शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये आजपर्यंत (दि़११ जानेवारी) दोन वर्षांत एकूण ४० लाख ७५ हजार ३ जणांनी म्हणजेच, पुण्याच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त (सन २०११ च्या जनगणनेपेक्षा) नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली आहे.
सदर चाचण्यांमध्ये ५ लाख ३२ हजार ५६१ जण कोरोनाबाधित आढळून आले असून, यापैकी ५ लाख ३ हजार ९७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार १३० जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी शहरात १४ हजार ९८३ जणांनी कोरोनाची चाचणी करून घेतली असून, यापैकी ३ हजार ४५९ जण बाधित असल्याचे आढळून आले आहे़ तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी २३ टक्के इतकी झाली आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात दोन जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी एक जण पुण्याबाहेरील आहे. दिवसभरात १ हजार १०४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.