पुणे : कोरोनाच्या साथीत दोन वर्षामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये मृत्युदर ९ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. तिसऱ्या लाटेमध्ये संसर्गाची तीव्रता कमी असल्याने मृत्युदर एक टक्क्याहूनही कमी नोंदवला गेला. तिसरी लाट ओसरत असताना गेल्या बारा दिवसांमध्ये पुणे शहरात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. मार्च २०२० मधील मृत्यूचे प्रमाण दोन वर्षांमध्ये शून्यावर येऊन पोहोचणे, ही दिलासादायक बाब आहे. शहरात ४ मार्च रोजी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यानंतर, गेल्या १२ दिवसांमध्ये एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.
कोरोनाची लागण झालेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण दोन्ही लाटांमध्ये जास्त होते. पहिल्या लाटेमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयात सर्वाधिक मृत्यू नोंदवले गेले. दुसऱ्या लाटेमध्ये वेळेवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर वेळेवर न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. पहिल्या लाटेत एप्रिल २०२० मध्ये पुणे शहराचा मृत्युदर देशात सर्वाधिक असल्याचे दिसून आले होते. १७ एप्रिल २०२० रोजी पुण्याचा मृत्युदर सर्वाधिक ९.१८ टक्के इतका होता. देशाच्या मृत्युदराच्या तुलनेत हा तीनपट जास्त होता.
भारतात दुसऱ्या लाटेमध्ये कोविडची सर्वोच्च रुग्णसंख्या चार लाख एवढी होती. दुसऱ्या लाटेमध्येही कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा पुणे शहरात जास्त होता. शहरात एका आठवड्यात कोरोनाबाधितांचे ४००-४५० मृत्यू झाले. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरअभावी अनेक जण मृत्यूच्या दाढेत ढकलले गेले. दुसऱ्या लाटेमध्ये मृत्युदर ६ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये शहराने कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक अनुभवला. मात्र, मृत्युदर ०.०३ टक्के इतका नगण्य होता.
व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्याही नगण्य आहे. बुधवारी शहरात २११६ इतक्या कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैकी २१ रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले. १२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या एक रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर तीन रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णसंख्या ३४१ इतकी आहे. शहरात आजवर ९३४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.
आठवड्याभरातील कोरोना आकडेवारी :
दिनांक चाचण्या कोरोनाबाधित
१० मार्च २२४५ ११६
११ मार्च २६७९ ४१
१२ मार्च २३१४ ६१
१३ मार्च १९४४ ६५
१४ मार्च १२६२ १९
१५ मार्च २१०१ १८
१६ मार्च २११६ २१