पुणे : पुणे महापालिकेमार्फत अंथरुणावर खिळलेल्या आणि शारीरिक हालचाल न करता येणाऱ्या व्यक्तींसाठी, आजपासून विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
ज्या व्यक्ती अंथरुणावर खिळलेल्या आहेत आणि पुढील सहा महिने त्यांची परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता असेल आणि त्यांना लस द्यावयाची असेल अशा व्यक्तींकरिता ही लसीकरण विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य अंथरुणावर खिळलेल्या अवस्थेत आहेत, अशा नागरिकांनी लस हवी असणाऱ्या त्या व्यक्तींचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून बसण्याचे कारण, सदरची व्यक्ती लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ञांचे प्रमाणपत्र तसेच व्यक्तीच्या जवळचे नातेवाईक किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तीने संदर्भातले संमतीपत्र सादर करावे.
सदर माहिती " bedriddenvaccination.pune@gmail.com " या ई-मेलवर पाठवावी. त्यानंतर या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर, पात्र ठरलेल्या व्यक्तींना त्यांच्या दिलेल्या घरच्या पत्त्यावर लसीकरणाची तारीख आणि वेळ कळविण्यात येणार आहे. दरम्यान, लसीकरण करताना आणि लसीकरणानंतर व्यक्तीचे तीस मिनिटे निरीक्षण करण्यासाठी फॅमिली डॉक्टर उपस्थित असणे अपेक्षित आहे. या मोहिमेमार्फत रुग्णांना कोव्हॅक्सिन लसीचा डोस देण्यात येणार आहे.