पुणे शहरामध्ये उद्या फक्त कोव्हॅक्सिन दिलेल्या नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. हे लसीकरण देखील फक्त दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु असलेल्या नागरिकांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. कोव्हीडशिल्डचा साठा न आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
पुणे शहरात सध्या फक्त ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. लसीचा साठा पुरावा यासाठी राज्य सरकार कडुन हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर देखील लसीच्या पुरवठ्याचा प्रश्न सुटायला तयार नाही . पुणे महापालिकेत कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन असे दोन्ही लसींचे लसीकरण केले जात आहे. मात्र काल महापालिकेला फक्त कोव्हॅक्सिनच पुरवले गेले. त्यामुळे शहरात उद्या अनेक केंद्र बंद ठेवायची वेळ आली आहे. त्यातही कोव्हॅक्सिनचे फक्त १५०० डोस उपलब्ध असल्याने फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांनाच ही लस देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
“४५ वर्षांवरील नागरिकांसाठी उद्या एकूण १५ केंद्र उपलब्ध असतील. सर्व केंद्र कोवॅक्सिनचे असतील. १६ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस दिला जाईल. सर्व केंद्रांववरील लस केवळ दुसऱ्या डोससाठी उपलब्ध असेल. पहिला डोस दिला जाणार नाही” अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
दरम्यान उद्या साठा आला नाही तर परवा आणखी केंद्र बंद ठेवायची वेळ येवु शकते असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले