पुणे : पुणे शहरातून शिक्षणासाठी परदेशात जात असलेल्या विद्यार्थ्यांचे, आजपासून (मंगळवार दि. १ जून) लसीकरण सुरू करण्यात आले आहे. महापालिकेच्या कमला नेहरू रूग्णालयातील ५ व्या मजल्यावरील लसीकरण केंद्रांवर विद्यार्थ्यांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत माहिती दिली. शहरातून परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी या विशेष मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी व बुधवारी म्हणजे १ व २ जून रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत ही मोहिम राबविण्यात येणार असून, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे नोंदणी न करता थेट टोकन पध्दतीने लसीकरण केले जाणार आहे.
या लसीकरणाकरिता पुण्यातील रहिवाशी असल्याचे पुरावे तसेच उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी, म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र, परदेशी व्हिसा, व्हिसा मिळविण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले आय-२० किंवा डीएस-१६० फॉर्म इत्यादी कागपत्रे सादर करावी लागणार आहेत.
सदर कागदपत्रे studentvaccination.pune@gmail.com या इमेल आयडी वर लसीकरणास येण्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्यांने पाठवावीत व महापालिकेने दिलेल्या वेळेत लसीकरण केंद्रावर उपस्थित रहावे असेही सांगण्यात आले आहे.