"मी लस घेतली, पण फोटो करता नौटंकी करत नाही; कारण...", अजित पवारांच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 01:21 PM2021-03-26T13:21:42+5:302021-03-26T13:22:36+5:30
Ajit Pawar Take Corona Vaccine: कोरोनाच्या लसीकरणा संदर्भात माहिती देत असताना अजित पवार यांनी लस घेतल्याची माहिती दिली. पण यावेळी अजित पवारांच्या वक्तव्यानं एकच हशा पिकला.
Pune Corona Updates: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीनंतर पुण्यातील निर्बंध आणखी कठोर करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यासोबतच पुण्यातील परिस्थिती अशीच कायम राहिली तर १ एप्रिलला कठोर निर्णय घ्यावा लागेल असा इशारा अजित पवार यांनी दिला. याचवेळी कोरोनाच्या लसीकरणा संदर्भात माहिती देत असताना अजित पवार यांनी लस घेतल्याची माहिती दिली. (Ajit Pawar Takes Corona Vaccine)
...तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही; अजित पवारांचा पुणेकरांना निर्वाणीचा इशारा
"देशाच्या पंतप्रधानांनी आता ४५ वर्ष वयाच्या वरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वयोगटातील सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी लसीकरण करून घ्यावं. मीही लस घेतलीय आणि तुम्हीही लसीकरण करुन घ्या", असं अजित पवार म्हणाले. त्यावर पत्रकारांनी अजित पवार यांना तुम्ही केव्हा लस घेतली? याबाबत विचारलं असता अजित पवार यांनी "मी लस घेतली पण फोटो काढण्याची नौटंकी मी करत नाही. इतरांनी फोटो काढले कारण त्यांना पाहून लोक लस घेतील. पण मी फोटो काढला असता तर लस घेणारेही घेणार नाहीत", असं अजित पवार म्हणाले आणि पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.
पुण्यात ३० मार्चपर्यंत कठोर निर्बंध
अजित पवार यांनी पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत यावेळी चिंता व्यक्त करत नागरिकांकडून नियमांचं अजूनही पालन होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. ३० एप्रिलपर्यंत पुण्यात निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. पण तोवरही कोरोनाची रुग्णसंख्या थांबली नाही. तर १ एप्रिल रोजी कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं म्हणत अजित पवार यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.
पुण्यात आता नेमकं काय सुरू आणि काय बंद राहणार?
- रात्रीची संचारबंदी पुन्हा सुरू होणार
- नियमांचे पालन केले नाही तर १ एप्रिलला कठोर निर्णय घ्यावे लागतील.
- लग्न सोडून इतर समारंभ पूर्ण बंद
- उद्यान, बाग बगीचे फक्त सकाळीच सुरू राहणार
- मॉल, मार्केट, चित्रपटगृह क्षमतेच्या ५० टक्केच सुरू राहणार
- सार्वजनिक वाहतूक सुरूच राहणार
- हॉटेलमध्ये फक्त ५० टक्के उपस्थितीला परवानगी
- हॉटेलात जेवण करण्यापेक्षा होम डिलिव्हरीचा पर्याय वापरण्याच्या सूचना