पुणे : महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कारांना तीन वर्षांनी मुहूर्त लागला असून, तीन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी केली. २०१७ ते २०१९ या तीन वर्षांचे मुख्य पुरस्कार अनुक्रमे शाहीर अंबादास तावरे, रेश्मा परितेकर, सुरेखा पुणेकर यांना जाहीर झाले आहेत. येत्या सोमवारी (दि. ९) हे पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. लोकनाट्य व लोककलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच या क्षेत्रात आयुष्यभर कार्यरत राहून कलेची सेवा करणाऱ्या व्यक्तींचा गौरव १९९५पासून पालिकेकडून येतो. यापूर्वी यमुनाबाई वाईकर, शाहीर साबळे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ तमाशा कलावंत काळू-बाळू, ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण, मधू कांबीकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. या वेळी उल्हास पवार, जयप्रकाश वाघमारे, शाहीर हेमंत मावळे, सत्यजित खांडगे, शाहीर चेतन हिंगे उपस्थित राहणार आहेत. ...........२०१७ सालचा मुख्य पुरस्कार शाहीर अंबादास तावरे यांना जाहीर झाला आहे. तर, शाहीर महादेव जाधव, नृत्यांगना सीमा पोटे, पेटीवादक प्रताप लाखे, दिवंगत अशोक काळे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. .............२०१८ सालचा मुख्य पुरस्कार रेश्मा परितेकर यांना देण्यात येणार असून ढोलकीवादक विनायक वाघचौरे, गायिका मिलन काळे, संगीतकार राजेंद्र मोरे, राष्ट्रीय भारुडकार हमीद अमीन सय्यद, गोंधळी हरीश सुरेश पाचंगे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ..........२०१९ सालचा मुख्य पुरस्कार सुरेखा पुणेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर, अन्य पुरस्कारांसाठी गोंधळी श्रीकांत रेणके, भारूड सम्राट सावता केशव फुले, भारूडकार जोशी, बाळासाहेब निकाळजे, हेमा ऊर्फ मल्लाप्पा रंगप्पा कोरबरी यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेच्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कारांना अखेर मुहूर्त; महापौरांकडून घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 11:57 AM
लोकनाट्य व लोककलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा महापालिकेकडून गौरव
ठळक मुद्दे सुरेखा पुणेकर, रेश्मा परितेकर, अंबादास तावरे यांचा होणार गौरव येत्या सोमवारी (दि. ९) हे पुरस्कार प्रदान केले जाणार