पुणे : पुण्यातील मेट्रोचे खांब बेकायदेशीर जाहिरातीसाठी हक्काची ठिकाणे बनू लागली आहेत. याची सुरुवात नगरसेवकांकडूनच झाली आहे. किरण दगडे पाटील यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स कोथरूड मध्ये मेट्रोच्या चार खांबावर लागले आहेत. नागरिकांकडून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
पालिका अधिनियमानुसार मेट्रोच्या खांबावर फ्लेक्स किंवा बँनर लावण्याची कोणतीही परवानगी नसल्याचे मेट्रो पदाधिकारी सांगत आहेत. पण बँनर लावायचे असल्यास रितसर परवानगी घेऊच चलन आकारणी करुन परवानगी दिली जात असते. पण कोथरूड मधील खांबा अनाधिकृत फ्लेक्स लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या वरदहस्ताने लावले गेले आहेत. असा प्रश्न नागरिकांनी पालिका प्रशासनाला विचारला आहे.
हे बँनर मेट्रो खांबाला नुसते लटकवले असुन किरकोळ वारा आला तरी हलत असतात. जर अचानक वाऱ्याने ते पडून नागरिक जखमी झाल्यावर जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत मेट्रोचे अभियंता प्रशांत कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
''या फ्लेक्सची कोणतीही परवानगी दिली गेली नाही. पाहणी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल. धोकादायक फ्लेक्स तातडीने हटविण्यात येतील अनाधिकृत बँनर वर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आकाशचिन्ह निरीक्षक संतोष गोंधळेकर यांनी सांगितले.''
''केंद्राने राबविलेल्या योजनांचे कोथरूड मध्ये बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. मनमानी कारभारामुळे परिसर गलिच्छ वाटत आहे. या गोष्टी लोकप्रतिनिधीना शोभत नाहीत असे स्थानिक नागरिक दिप्ती कुलकर्णी म्हणाल्या आहेत.''