VIDEO: राज्यमंत्र्यांकडूनच कोरोना नियम पायदळी; दत्तात्रय भरणेंची विनामास्क मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 10:16 PM2021-09-11T22:16:05+5:302021-09-11T22:30:25+5:30
पिंपरी बुद्रुक येथे कार्यकर्त्यांच्या खांद्यावरून दत्तात्रय भरणेंनी केली विनामास्क सवारी
बारामती: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आले आहे. त्यामुळे सण उत्सवात, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना वारंवार देण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार सांगूनही राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी कोरोना नियम पायदळी तुडवल्याने समोर आले आहे. पिंपरी बुद्रुक येथे भरणे यांनी विनामास्क कार्यकर्त्यांच्या खांद्यावरून सवारी केली. विशेष म्हणजे यावेळी एकाही कार्यकर्त्यांच्या तोंडावर मास्क नव्हता. त्यामुळे आता अजितदादा यांना तुम्हीच आवरा असे साकडे घालण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.
सध्या सण उत्सवांचा काळ सुरु आहे. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आल्याने सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र, अशा परिस्थितही काही ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर येत आहे. विशेष करून राजकीय कार्यक्रम, लग्नसमारंभांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तेथे मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग क्वचितच पहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच जुन्नर तालुक्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रीवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हेदेखील उपस्थित होते. त्यावेळीही कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. त्यावरून नियम फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का, असा सवालही नागरिकांतून उपस्थित केला जात होता. तर जुन्नरमध्ये लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी जमवल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटना ताज्या असतानाच आता इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीच कोरोना नियम पायदळी तुडवल्याचे समोर आले आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचा फज्जा; खुद्द राज्यमंत्री विनामास्क https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/DD59TAOJI6
— Lokmat (@MiLOKMAT) September 11, 2021
विविध विकासमांचे भूमिपूजन व जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटनासाठी राज्यमंत्री भरणे पिंपरी बुद्रुक येथे आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी चक्क भरणेंना खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढली. महत्त्वाचे म्हणजे राज्यमंत्र्यांसह कार्यकर्त्यांनीकडे मास्क नव्हता. फिजिकल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडाला होता. लासुर्णे येथील कार्यक्रमालाही राज्यमंत्री भरणे उपस्थित होते. तेथेही अशीच विनामास्कची गर्दी झाली होती. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना पायदळी तुडवण्याचे काम राष्ट्रवादीतीलच काही नेतेमंडळींकडून होत आहे. नियम केवळ सर्वसामान्य लोकांसाठीच आहेत का असा सवाल इंदापूरकर उपस्थित करू लागले आहे.