प्राची कुलकर्णी -
पुणे : पंतप्रधाननरेंद्र मोदींनी राजकारण्यांनी लसीकरण करुन घेण्याची गडबड करु नये तसेच आपल्या पदाचा फायदा घेऊ नये हे स्पष्ट केलेले असतानाच शासनाचा आदेश डावलून थेट पंचायत समितीच्या सभापतींनीच लसीकरण करुन घेण्याचा प्रकार पुण्यात उघडकीला आला आहे. महत्वाचे म्हणजे यांनी चक्क नोंदणी करुन ही लस मिळवली आहे.
वेल्हा पंचायत समितीचे सभापती दिनकर सरपाले यांनी लस घेण्याचा मान पटकावला आहे. पंचायत समिती मधील सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण संपल्याने आपल्यासह आणखी चारपाच जणांचे लसीकरण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय कोणालाही लस देण्यास मनाई केली असताना सभापतींना लस मिळाली कशी असा सवाल आता विचारला जातो आहे. याप्रकरणी आता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून संबंधितांना शो काॅज नोटिस बजावण्यात आली आहे.
सरकारतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यासाठी सरकार कडून एक प्लॅन तयार करण्यात आल्या आहेत. यात सुरुवातीला आरोग्य कर्मचारी- फ्रंटलाईन वर्कस तर त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण होणार आहे.
पण गंमत म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होण्यापूर्वीच वेल्ह्यातल्या पंचायत समितीच्या सभापतींनी आपले लसीकरण करुन घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे या लसीकरणाचे त्यांनी फोटोसेशनही करुन घेतले आहे. याबाबत त्यांना विचारले असतां सरपाले म्हणाले “ आठ दिवसांपूर्वी पंचायत समिती मध्ये माझ्या कडून कागद पत्रे मागवण्यात आली होती. त्यानंतर मला एसएमएस आला. आणि मग माझे लसीकरण करण्यात आले. मी एकट्याने नाही तर माझ्या सोबत आणखी तीन चार जणांचेही लसीकरण झाले आहे.”
पण ही लस मिळाली कशी हे विचारले असता सरपाले म्हणाले” आमच्या कडच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण संपले होते. त्यामुळे आमचे लसीकरण करण्यात आले. रितसर नोंदणी करुन हे लसीकरण केले आहे. मी सभापती असल्याने हे लसीकरण करण्यात आले आहे”
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, या प्रकरणी मी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडुन अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यावर पुढचा निर्णय घेतला जाईल.”