पुणे : वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलीसच नाही तर स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न केले पाहिजेत. वाहतूककोंडीला केवळ वाहतूक विभागच नाही तर आता स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यांनी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही. त्यांना थेट वाहतूक विभागालाच सलग्न करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.
दिवाळीच्या सुमारास खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांना वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला होता. संघटित गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु वाहतूककोंडी कमी करण्यात आपल्याला अपयश आले, अशी कबुली पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिवाळीत एका कार्यक्रमात दिली होती. त्यानंतर शहर पोलीस दलाच्या अजेंड्यावर वाहतूक हा विषय अग्रस्थानी आला आहे. त्याचे प्रत्यंतर बुधवारी पोलीस आयुक्तालयात झालेल्या गुन्हे आढावा बैठकीतही उमटले.
या बैठकीत शहरातील वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. पुढील कालावधीत वाहतूककोंडी कशा प्रकारे शहरातील कमी करता येईल, कोणते बदल करणे आवश्यक आहेत यासह अनेक विषयांचा आढावा घेण्यात आला. या वेळी वाहतूक विभागाच्या वतीने केलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले. पोलीस आयुक्त गुप्ता आणि सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्वांना फैलावर घेतले.
...थेट वाहतूक विभागात पाठवू
पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूककोंडी झाली तर शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आपले काम गुन्हे निरीक्षकाकडे सोपवून वाहतुकीसाठी रस्त्यावर उतरण्याच्या सूचना दिल्या. प्रभारी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने याबाबत काम केले नाही तर त्यांना थेट वाहतूक विभागात पाठवण्यात येईल, असा इशाराही दिला गेला आहे.
असे पुरविले मनुष्यबळ
वाहतूक नियमनासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील एक अधिकारी, ५ कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. तसेच मुख्यालयातून वाहतूक पोलिसांच्या दिमतीला दिलेले अधिकारी व कर्मचारी ३१ डिसेंबरपर्यंत तेथेच कायम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.