पुणे : शहरात वाहन चोरांसह, मंगळसूत्र-गंठण चोर, घरफोड्यांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. पोलिस निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असताना, चोर त्यांचे काम मात्र अत्यंत सफाईदारपणे करत आहेत. मात्र, यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ होत असून, चोरीला गेलाला मुद्देमाल परत मिळेल की नाही याबाबत देखील देखील शंका असल्याने ते निराश होत आहेत. शहरात घरफोडीच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये ३३ लाख ५ हजार ६०२ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी तीन पोलिस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील पहिल्या घटनेत मार्केटयार्ड परिसरातील गुलटेकडी येथील रहिवासी नौशीन निसार अहमद खान (३६, रा. इरा हाऊसिंग सोसायटी) यांच्यासह आदिल बादशहा सय्यद यांच्या सदनिकेत शिरून दरवजाचा कडी-कोयंडा कापून लोखंडी व लाकडी कपाटातील २२ लाख ८०२ रुपयांचे सोन्या-चांदीचेचे दागिने व न्यायालयाची कागदपत्रे चोरून नेली. हा प्रकार १३ ते १४ मे दरम्यान मध्यरात्री घडल्याचे मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कांबळे करत आहेत.
दुसऱ्या घटनेत चंदन नगर परिसरातील एका दुकानातून चोरांनी १ लाख रुपये रोख चोरून नेल्याप्रकरणी अब्दुल मस्जीद घुलाई शेख (२९, रा. संघर्ष चौक) यांनी चंदन नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अब्दुल शेख हे त्यांचे दुकान १२ मे रोजी बंद करून दुकानाच्या वर असलेल्या खोलीत झोपण्यासाठी गेलेले असताना चोरांनी बनावट चावीच्या सहाय्याने दुकान उघडून दुकानाच्या गल्ल्यातील १ लाखांची रोकड लांबवली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस कर्मचारी रणदिवे करत आहेत.
तर, तिसऱ्या प्रकरणात गुलटेकडी परिसरातील रहिवासी जयकुमार राजकुमार मिसाळ (३४) यांच्या घरातून २ मे ते ७ मे दरम्यान अज्ञात चोराने घुसून १४ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी मिसाळ यांनी १५ मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बावचे या करत आहेत.