कोरेगाव भीमा : सणसवाडी येथील एका कंपनीजवळ किरकोळ वादातून परप्रांतीयाचा खून झाल्याची घटना घडली. दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी एका तासात आरोपीला जेरबंद केले. गंभीर गया सिंग (वय ४५ रा. सणसवाडी) असे खून झालेल्या परप्रांतीयाचे नाव आहे. याप्रकरणी सचिन उर्फ आफऱ्या अंकुश गायकवाड (वय ३० रा. माळी मळा, तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर) याला गजाआड केले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सणसवाडी येथील एका कंपनीजवळ गंभीर सिंग याचे टायरचे दुकान असून, सचिन नेहमी सिंग याच्या दुकानावर येत होता, नेहमीप्रमाणे सायंकाळच्या सुमारस सचिन दुकानावर आलेला असताना त्याने गंभीर सिंग यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सिंग याने पैसे न दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. यावेळी सचिन याने दुकानातील लोखंडी टामी घेऊन गंभीरला मारहाण केली. त्यानंतर सचिन पळून गेला. काही वेळात गंभीरला स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले.
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस हवालदार शंकर साळुंके, श्रीमंत होनमाने, संदीप कारंडे, पोलीस नाईक अमोल दांडगे, जयदीप देवकर, निखिल रावडे, उद्धव भालेराव यांनी तातडीने सूत्रे हलवत पळून गेलेल्या सचिन गायकवाडला अवघ्या एका तासात गजाआड केले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रणजित पठारे हे करत आहेत.