पुणे : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मांजरी परिसरातील बेनकर वस्ती येथे मध्यरात्रीच्या सुमारास एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनचे पॅनल फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र एटीएममधील सायरन वाजल्याने त्यांचा डाव फसला आणि ते घाबरून पळून गेले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली.अधिकच्या माहितीनुसार,चोरट्यांनी एटीएमच्या मशीनचे पॅनल तोडले होते, परंतु पॅनल फोडताच सायरन जोरात वाजू लागला. त्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाले आणि चोरट्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
दोन्ही चोर फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.