पुणे : शिरूर बाजारपेठेतील सराफ व्यावसायिकावर गोळीबार करून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तडीपार गुंडाला ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. शरद बन्सी मल्लाव (वय २४, रा. शिरूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार सागर ऊर्फ बबलू दत्तात्रय सोनलकर (वय २३, रा. धायरी) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्याकडून ३ गावठी पिस्तुले, २ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा १ लाख २५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. मल्लाव हा पुणे ग्रामीण व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातून एक वर्षाकरिता तडीपार आहे. सागर सोनलकर याच्यावर २ गुन्हे दाखल आहेत.
शिरूर शहरातील बाजारपेठेतील सुभाष चौकात जगन्ना कोलथे सराफ दुकानाचे मालक अशोक कोलथे व त्यांचा कामगार भिका एकनाथ पंडित हे २८ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता दुकान बंद करत होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील सोने लुटण्याचा प्रयत्न केला. भिका पंडित यांनी विरोध केल्यावर त्यांच्यातील एकाने त्यांच्या डोक्यावर पिस्तुलाचा दस्ता मारला आणि गोळीबार करून ते पळून गेले. भर बाजारपेठेत हा प्रकार घडल्याने शहरात घबराट पसरली होती. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करताना सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यातून रेकाॅर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. शरद मल्लाव याने सागर सोनलकर याच्या मदतीने हा प्रकार केल्याचे पुढे आले. आरोपी सिंहगड किल्ल्याच्या जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जंगलातून शरद मल्लाव याला पकडले. त्याच्याकडून ३ पिस्तुले, २ जिवंत काडतुसे व दुचाकी जप्त केली.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक गणेश जगदाळे, प्रदीप चौधरी, अमित सिदपाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
मिसफायरमुळे गुन्हेगार जखमी :
सराफ दुकान लुटण्याचा प्रयत्न फसल्यानंतर दोघेही पळून गेले होते. त्यानंतर सोनलकर हा पुण्यातील धायरी येथील घरी आला. घरी पिस्तूल हाताळताना अचानक त्यातून गोळी उडाली. ती त्याच्या नाकाला चाटून गेल्याने तो जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल केले असून, उपचारानंतर त्याला अटक करण्यात येणार आहे.