पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याची पुन्हा पोलीस कोठडी हवी असल्यामुळे गुन्हे शाखेने आरोपीच्या पोलिस कोठडीसाठी केलेला अर्ज गायगोले कोर्टाने बुधवारी फेटाळला. गाडेच्या अटकेची परवानगी न मिळाल्याने थ्रीडी इफेक्ट वापरून पोलिस तपास करण्यास काही अंशी अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान, गाडेला दि. २८ फेब्रुवारी अटक केल्यांनतर त्याला दि. १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी अर्जात पुन्हा पोलीस कोठडी मिळण्याबाबत ठोस कारण दिले नसल्याने न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला.
एका २६ वर्षीय पीडित तरूणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात बलात्कार झाल्याची तक्रार दिली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा तपास सुरु केला. पोलिसांना गुंगारा देणा-या व उसाच्या शेतात लपून राहिलेल्या गाडे याला दि.२८ च्या रात्री सव्वा एकच्या सुमारास बेड्या ठोकण्यात आल्या.दरम्यान त्याच्यावर यापूर्वी सहा लुटमारीचे गुन्हे देखील दाखल असल्याचे समोर आले होते. त्याला अटक झाल्यानंतर त्याच्या वैद्यकीय चाचणी बरोबर डीएनए सॅम्पल घेण्यात आले आहे. पोलिस कोठडीच्या दरम्यान त्याला घटनास्थळावर नेण्यात आले होते. तो ज्या शेतात लपून बसला होता त्या शेताची पाहणी करून पुरावा गोळा करण्यात आले. या दरम्यान तो ज्यांना ज्यांना भेटला त्यातील खटल्याच्या अनुषंगाने जबाब नोंदविण्यात आले आहे.
थ्री डी तंत्रज्ञान वापरून गाडेच्या लकबीची होणार होती चाचपणीपोलिसांनी या प्रकरणात आधुनिक थ्रीडी तंत्रज्ञान वापरून पोलिस त्याची अधिक चौकशी करणार होते. परंतु, यामध्ये त्याची चालण्याची स्टाईल तसेच त्याच्या छोट्या छोट्या लकबी यामाध्यमातून तपासून पुराव्यांमध्ये त्याचा अंतर्भाव केला जाणार होता. मात्र,न्यायालयातून गाडेच्या ताब्यालाच परवानगी न मिळाल्याने या कार्यवाहीला काहीकाळ खंड पडला आहे. ही सर्व प्रक्रिया पार पाडता यावी व गुन्ह्यातील तपासातील काही बाबींवर विचारपूस करण्यासाठी त्याची पोलिस कोठडी पोलिसांना हवी होती. त्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. मात्र, तो अर्ज फेटाळण्यात आला असल्याचे बचाव पक्षाचे वकील अॅड. वाजीद खान बिडकर यांनी सांगितले.