पुणे : सोसायटीतील स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करत दोघांनी सोसायटीतील अंतर्गत रस्त्यावर दोन चारचाकी वाहनांद्वारे रेसिंगला सुरुवात केली. याबाबतचा जाब रहिवाशांनी विचारला असता, त्यांनी अरेरावी केली. हा प्रकार वाघोली येथील न्याती एलन सोसायटीत बुधवारी (दि. ९) दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास घडला.
याप्रकरणी वाघोली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, श्रेयस गोरे (१९) आणि साहिल गोरे (२०, दोघेही रा.गोरे वस्ती) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली असून, त्यांच्या गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले.
अधिक माहितीनुसार, वाघोली येथे न्याती एलन ही सोसायटी आहे. या सोसायटीत दोघांनी बेकायदेशीर प्रवेश केला. अंतर्गत रस्त्यावर थार आणि स्कॉर्पिओ गाडीची रेस लावली. हा प्रकार इमारतीच्या छतावरून एका व्यक्तीने मोबाइलमध्ये चित्रित केला आहे. त्यामध्ये दोन गाड्या एका ठिकाणी थांबून वेगात धावत आहेत.
गाड्या पळवून झाल्यानंतर सोसायटीतील काही व्यक्तींनी थार गाडी चालवणाऱ्या तरुणाला थांबवून जाब विचारला. त्यावेळी त्याने अरेरावीची भाषा केली. या प्रकाराची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी दोघा तरुणांना ठाण्यात घेऊन आले. त्यांच्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई केली.