पुणे : प्लॉट नावावर करून देण्याचे आमिष दाखवून तिघा ज्येष्ठांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कैलास सखाराम जाधव (वय ६०, रा. एकाक्ष सोसायटी, मॉडेल कॉलनी) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी प्लॉटधारक महेंद्र शहा, महेंद्र भंडारी व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २८ जानेवारी २०१५ पासून आतापर्यंत घडला आहे.
अधिक माहितीनुसार, संशयित आरोपी महेंद्र शहा व महेंद्र भंडारी यांनी एरंडवणा येथील सुनीता सोसायटीमधील प्लॉट मूळ मालक अत्रे यांच्याकडून खरेदी केला होता. फिर्यादी आणि त्यांच्या दोघा सहकाऱ्यांना ७५० चौ़ मीटरचा प्लॉट नावावर करुन देतो, असे त्यांनी सांगितले. फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ५ कोटी १९ लाख रुपये घेतले. त्यानंतर प्लॉट नावावर करून देण्यास टाळाटाळ केली. फिर्यादी यांनी प्रत्यक्ष कागदपत्रे पाहिल्यावर त्यांना ८ गुंठे जागा सांगितली असताना प्रत्यक्षात ती जागा ७ गुंठेच असल्याचे लक्षात आले. त्यांनी पैसे परत मागितल्यावर ते परत केले नाही आणि विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट तपास करीत आहेत.