मंचर : अतिक्रमण काढण्याच्या व जमिनीच्या वादातून एकलहरे (ता. आंबेगाव) येथे एका व्यक्तीचा अपघाताचा बनाव करून खून करण्यात आला आहे. संजय शिवराम वायाळ (वय 46 रा. फकीरवाडी सुलतानपूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अमर लक्ष्मण वायाळ, भरत जानकू वायाळ, लक्ष्मण जानकू वायाळ (सर्व रा. फकीरवाडी सुलतानपूर) व त्यांचे साथीदार यांच्या विरोधात मंचरपोलिस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन दिवसात लागोपाठ दोन खुनांच्या घटना घडल्याने आंबेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी संजय वायाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे पती संजय वायाळ यांनी ग्रामपंचायत एकलहरे येथे भरत जानकू वायाळ, अमर लक्ष्मण वायाळ, लक्ष्मण जानकू वायाळ यांच्या अवैद्य बांधकामाची नोंद होऊ नये म्हणून अर्ज दिला होता. तिघांनी पती संजय यांना मारहाण केली होती. मंचर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल झाली होती.
तिघेही संजय वायाळ यांच्या कुटुंबाशी वारंवार भांडणे करत होते. संजय वायाळ यांची वडिलोपार्जित जमीन मिळावी असा प्रयत्न त्यांचा होता. आज सकाळी संजय वायाळ हे नाष्टा करून घराबाहेर पडले. दुपारी बारा वाजता ते सुलतानपूर रस्त्यालगत गवतामध्ये जखमी अवस्थेत मिळाले. बाजूलाच त्यांची मोटरसायकल तसेच भरत जानकू वायाळ यांची चारचाकी गाडी उभी होती. संजय वायाळ यांच्या गळ्यावर, डोक्यात,हातावर गंभीर जखमा आढळून आल्या. संजय वायाळ यांना उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालय नेण्यात आले. उपचारापूर्वीच ते मरण पावले होते. ग्रामपंचायत कार्यालय एकलहरे येथे अमर लक्ष्मण वायाळ, भरत जानकु वायाळ आणि लक्ष्मण जानकू वायाळ यांच्या अवैद्य बांधकामाची नोंद होऊ नये असा अर्ज संजय वायाळ यांनी दिला होता.
त्याचा राग मनात धरून तसेच यापूर्वी झालेला भांडणाचा राग मनात धरून त्यांनी साथीदारांच्या मदतीने धारदार हत्याराने संजय वायाळ यांचा खून केल्याची फिर्याद त्यांची पत्नी माधुरी वायाळ यांनी दिली आहे. पोलिसांनी अमर लक्ष्मण वायाळ, भरत जानकू वायाळ, लक्ष्मण जानकू वायाळ यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताचा बनाव करून खून केल्याचे उघडकीस आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे व अमृत देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश होडगर करत आहेत.