अत्याचाराप्रकरणी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक आघाडी उपाध्यक्षाच्या पोलिस कोठडीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:48 IST2025-04-03T18:47:25+5:302025-04-03T18:48:13+5:30
आत्तापर्यंत किती निराधार मुलींना आश्रय देऊन त्यांच्याशी गैरकृत्य केले

अत्याचाराप्रकरणी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक आघाडी उपाध्यक्षाच्या पोलिस कोठडीत वाढ
पुणे : शिक्षणाच्या निमित्ताने अनाथ मुलींना घरी आणून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) अल्पसंख्याक आघाडीचा महाराष्ट्र उपाध्यक्ष शंतनू सॅम्युअल कुकडे याने आत्तापर्यंत किती निराधार मुलींना आश्रय देऊन त्यांच्याशी गैरकृत्य केले आहे, याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये न्यायालयाने दि. ७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
आरोपी शंतनू सॅम्युअल कुकडे याने काही महिन्यांपूर्वी दोन अनाथ मुलींना पुण्यात शिक्षणासाठी आणले होते. तुमच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च करतो, नोकरीला लावतो, असे आश्वासन देऊन त्याने मुलींना स्वतःच्या फ्लॅटमध्ये ठेवले होते. दरम्यानच्या काळात त्याने एका मुलीवर बलात्कार केला. तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी मुलीने २९ मार्च रोजी समर्थ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली, न्यायालयाने त्याला ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आरोपी कुकडे याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
सरकारी वकील नितीन कोंघे यांनी न्यायालयात सांगितले की आरोपी हा रेड हाऊस फाउंडेशन चालवित असून, या फाउंडेशनच्या नावाखाली आरोपीने फिर्यादीप्रमाणेच आणखी इतर महिला व मुलींना राहण्याची व नोकरीची हमी देऊन त्यांच्याशी गैरवर्तन केले असण्याची दाट शक्यता असून, या संस्थेचा सखोल तपास करायचा आहे. तसेच या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची आणि आणखी काही तक्रारदार महिला पुढे येऊन तक्रार देण्याची शक्यता आहे. त्या बाबींवर सखोल तपास करणे आवश्यक असून, आरोपीची उपस्थिती आवश्यक आहे. त्यानुसार न्यायालयाने आरोपीची पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे.