पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई करून पीडित पाच महिलांची सुटका केली. जगताप डेअरी चौक, पिंपळे सौदागर येथे मंगळवारी (दि. ६) ही कारवाई केली.
स्पा सेंटरची चालक-मालक सीमा दीपक धोत्रे (वय ३७, रा. नवी सांगवी) आणि स्पा सेंटरचा मॅनेजर रमेश कुमार साहीराम (वय २४, रा. गंगानगर, राजस्थान) यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी चौक येथे स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत पाच पीडित महिलांच सुटका करण्यात आली. पाच हजाराची रोकड, १४० रुपये किमतीचे इतर साहित्य आठ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन, असा १३ हजार १४० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनील शिरसाट, सुधा टोके, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.