पुणे : टपरीवाल्या दोघांनी तलवारीने मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आलेल्या रेकाॅर्डवरील गुंडाने तक्रार दाखल न करता वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंगावर धावून जात त्यांची नेमप्लेट तोडली. त्यांच्या मदतीसाठी आलेल्या पोलिस शिपायाला धक्काबुक्की केली. त्यांचाही शर्ट फाडून सरकारी कामात अडथळा आणल्याचा प्रयत्न केला.
पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणात रेकॉर्डवरील गुन्हेगार बुचड्या ऊर्फ अभिषेक ससाणे, कुणाल ससाणे यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सर्व प्रकार लोहियानगर पोलिस चौकी येथे व ससून रुग्णालयात सोमवारी रात्री पावणेबारा ते मंगळवारी पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होता. याबाबत पोलिस अंमलदार संतोष साबळे यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण तपास करीत आहेत.