ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर कोळमळा येथे ४८ तासात दुसरी बिबट मादी जेरबंद झाल्याचे स्थानिकांनी सांगितले थोडेसे घबराटीचे वातावरण कमी झाले असे नागरिक बोलत आहेत.अधिक माहिती अशी की गुरुवार दि. १० एप्रिल रोजी अंदाजे पहाटे ६ वाजता ओतूर मधील कोळमळामध्ये बिबट जेरबंद झाला अशी माहिती स्थानिकांनी वनविभागाला कळवली असता तत्काळ वनरक्षक विश्वनाथ बेले, तसेच किसन केदार, गंगाराम जाधव, गणपत केदार , फुलचंद खंडागळे, रोहित लांडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून घटनेची खात्री केली व वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर लहू ठोकळ यांना भ्रमणध्वनी वरून माहिती दिली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी सर्व वनकर्मचारी, तसेच सर्व ग्रामस्थ यांचे मदतीने पिंजऱ्याच्या साहाय्याने सदर बिबट यास योग्य त्या पद्धतीने रेस्क्यू करून त्याला सुखरूप माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले. बिबट मादी अंदाजे वय ७ ते ८ वर्ष अडकली असल्याचे वनविभागाने सांगितले.
कित्येक महिन्यापासून वारंवार बिबट्या दिसणे, वाहनाच्या मागे लागणे, मनुष्यावर धावणे असे प्रकार वारंवार प्रकार घडत होते रात्री तर सोडा दिवसापण घबराटीचे वातावरण होते त्यामुळे वनविभागाने ग्रामस्थांच्या मागणी नुसार पिंजरे लावला त्यात बिबट जेरबंद होत असल्याने नागरिकांनी वनविभाग बद्दल समाधान व्यक्त केले.