पुणे : गोखले इन्स्टिट्यूट ऑफ़ पॉलिटिक्स अँड इकाॅनॉमिक्स या संस्थेकडून आरोपी मिलिंद देशमुख याने त्याच्या सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीला यूजीसीच्या नियमांचे उल्लंघन करून रक्कम वळविताना गोखले इन्स्टिट्यूटमधील तत्कालीन कुलपती, कुलसचिव, अकाउंट ऑफिसर यांचा कशाप्रकारे सहभाग होता, याबाबत आरोपी व संबंधित व्यक्तीकडून एकत्रित तपास आवश्यक आहे, तसेच नागपूर येथील खरेदीपोटी सर्व्हिस चार्जेसच्या नावाखाली काही व्यक्तींना वेगवेगळ्या ट्रान्झेक्शनद्वारे ४० लाख रुपये वर्ग केल्याचे दिसून आले आहे.
ही रक्कम कशासाठी वर्ग केली याबाबत आरोपीकडे सखोल तपास करणे आवश्यक आहे, त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.गोखले इन्स्टिट्यूटचा एक कोटी 42 लाख रुपयांचा निधी नियमबाह्य पद्धतीने वळविल्याच्या आरोपावरून सर्व्हंट्स ऑफ इंडियाचा सचिव मिलिंद देशमुख याला डेक्कन पोलिसांनी अटक केली. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी ( दि ९) संपल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले.तपास अधिकारी गिरीशा निंबाळकर यांनी न्यायालयात सांगितले की, तपासात जप्त सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या गोखले इन्स्टिट्यूटसंदर्भातील लेजर स्टेटमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर रकमा कॅम्पस देखभाल खर्चाच्या नावाखाली वर्ग केल्याचे दिसत आहे. ही रक्कम नक्की कशासाठी वर्ग केली गेली याबाबत आरोपीकड़े सखोल चौकशी करायची आहे, त्यामुळे त्यांनी आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठड़ी देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपी मिलिंद देशमुख याला दि. ११ एप्रिलपर्यंत पोलिस कोठड़ी सुनावण्यात आली आहे.