वरवंड (पुणे) : वहिणीचे वडील मरणानंतर संपत्ती देणार नसल्याचा राग मनात धरून त्यांचा वनविभागाच्या हद्दीमध्ये मित्रांच्या मदतीने गळा दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. दौंड तालुक्यातील वरवंड येथे एक वर्षाने हा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी अतुल जगताप, प्रणव भंडारी, विजय मंडले, राकेश भंडारी (सर्व रा. वरवंड, ता. दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ मार्च २०२२ रोजी घडली. राकेश भंडारी याने आपली वहिनी सपना राहुल भंडारी यांना त्यांचे वडील सुरेश नेमीचंद गांधी हे त्यांच्या मरणानंतर मालमत्तेमध्ये हिस्सा देणार नाहीत यांचा राग मनात धरून वरवंडमध्ये वनविभागाच्या हद्दीमध्ये सुरेश गांधी यांचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी घरात पाय घसरून पडले व मयत झाले असा बनाव केला, अशी माहिती सर्व नातेवाइकांना सांगून त्याचा अंत्यविधी केला. या प्रकरणी चारजणांवर खून करणे व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक वर्षानंतर कालिदास शिवदास शिंदे यांनी फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव, पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे, सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे करीत आहेत.