पुणे - धायरी येथील रायकर मळा परिसरात काळूबाई चौकात असलेल्या ‘श्री ज्वेलर्स’ या सराफ दुकानावर आज दुपारी सुमारे २.५० वाजता तिघा दरोडेखोरांनी दहशत निर्माण करत अंदाजे २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे. दुकानमालक विष्णू सखाराम दहिवाल व त्यांचा एक कर्मचारी दुकानात उपस्थित असताना ही घटना घडली. सुरुवातीला एका इसमाने दुकानात येऊन सोन्याची चेन दाखवा, सोन्याची चेन द्या अशी धमकी दिली. मालक दागिने दाखवत असतानाच आणखी दोन इसम दुकानात घुसले.
तिघांनी मिळून दुकानमालकाला बनावट पिस्तुल दाखवून धमकावले,खेळण्यातल्या बंदुकीचा धाक दाखवला. शिवीगाळ केली व लूट करताना प्रतिकार करणाऱ्या दहिवाल यांना मारहाण केली. दुकानातील सुमारे ३० तोळे सोन्याचे दागिने लुटून दुचाकीवरून पसार झाले.
दुकानमालकाने दिलेल्या माहितीनुसार, यातील पहिला इसम, अंदाजे वय ३५ वर्षे, लाल रंगाचे हाफ टी-शर्ट, निळी जीन्स होता तर दुसरा इसम अंदाजे वय २५ वर्षे, काळा फुल टी-शर्ट, काळी पँट, डोक्यावर काळी टोपी, तोंड झाकलेला होता. यातील तिसरा इसम हा अंदाजे वय २५ वर्षे, क्रीम रंगाचा टी-शर्ट, पांढरी जीन्स, पांढरे बूट, डोक्यावर खाकी कॅप, पाठीवर काळी बॅग घेऊन होता. याच बॅगेत त्याने सोने भरले.
दरम्यान,घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत सीसीटीव्ही फुटेज तपासणीला सुरुवात केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असून, नागरिकांनी संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.