पुणे : बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी एका तरुणाला सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी ७ वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम पीडित मुलाला देण्यात यावी, दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक वर्षे कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नितीन नारायण कदम (वय २०) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय समुपदेशकाने फिर्याद दिली आहे. ३० जून २०१७ रोजी रात्री ८ ते १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कदम याने पीडित मुलाला बाथरूममध्ये नेत त्याला मारण्याची धमकी देत अनैसर्गिक कृत्य केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. लीना पाठक, ॲड. जावेद खान यांनी काम पाहिले. या खटल्यात त्यांनी ११ साक्षीदार तपासले. त्यामध्ये समुपदेशक, पीडित मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद ॲड. पाठक यांनी केला. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
याप्रकरणी तपासी अधिकारी म्हणून तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अरुण गौड यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक प्रवीण मोरे, न्यायालयीन कामकाजात गिरमे आणि कायगुडे यांनी मदत केली.