वडगाव मावळ (पुणे) : बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी बनावट पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई सोमवारी सायंकाळी वडगाव मावळ बाजारपेठ रोड येथे करण्यात आली.
स्वप्नील किसन मुऱ्हे (वय ३३ रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) असे अटक केलेले तरुणाचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, सोमवारी पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. त्यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांना वडगाव मावळ येथील एका व्यक्तीकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार वडगाव बाजार पेठेतील रोडवर स्वप्नील मुऱ्हे यास पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता विनापरवाना व बेकायदेशीर हेतूने कमरेला बाळगलेले गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे आढळून आले. तसेच दुचाकीसह एकूण ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस पुढील कारवाईसाठी वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.