पुणे - दिवाळीला अवघे 8 ते 10 दिवस राहिले असताना शनिवारी सुट्टी असल्याने खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे. पुण्यातील बाजारपेठ फुलली असून बाजाराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. समाधान चौक (बेलबाग चौक) ते मंडईपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. मंडई, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता परिसरात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली.
शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने शहर तसेच उपनगरातील नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. अनेकजण मोटारीतून खरेदीसाठी मध्यभागात आले होते. मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने मध्यभागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. शनिपार, मंडई, तुळशीबाग, रविवार पेठेतील कापडगंज परिसरातून चालणे देखील अवघड झाले होते. गर्दीतून वाट काढत नागरिकांनी खरेदी केली.
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही परिसरात पोलीस तैनात करण्यात आले होते तर काही ठिकाणी स्वयंसेवक तर स्वतः नागरिकांनी गर्दी हटवण्यासाठी मदत केली.