पुणे : अमेरिकन नागरिकांना त्यांच्या अॅपल मोबाइल व आयपॅडवर वापरण्यात येणा-या सफारी ब्राऊझरवर पॉपअॅप जनरेट करुन त्यांचे डिवाईस क्रॅश झााले असून ती समस्या सोडवून देण्यासाठी अॅपल आय ट्युन कार्ड खरेदी करायला लावून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणारे खराडी येथील आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सायबर सेलने उद्धवस्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन मुख्य सूत्रधारांना अटक केली आहे. आदित्य सदानंद काळे (वय २९, रा़ बावधन) आणि रोहित रामलाल माथूर (वय २९, रा़ लोहगाव) अशी त्यांची नावे आहे़
याबाबतची माहिती अशी, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांना या कॉल सेंटरविषयी माहिती मिळाली़ सायबर सेलकडील पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, कर्मचारी तसेच सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील या पथकाने खराडी येथील सिटी विस्टा या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर छापा टाकला़ तेथे व्ही टेक स्क्वेअर नावाचे कॉल सेंटर चालू होते़ या कॉलसेंटरमध्ये ४ मुले काम करीत होती़ या कॉलसेंटरमधून अमेरिकेमधील अॅपलचे मोबाईल व आयपॅड वापरणा-या नागरिकांना त्यांचे ते वापर करताना ब्राऊजरवर त्यांचे डिवाईसमध्ये एरर / सिस्टिम क्रॅश झाले असल्याचे मेसेज (पॉपअॅप) पाठवून त्यावर एका वेबसाईटमार्फत फोन करायला भाग पाडले जाते.
त्यानंतर या कॉलसेंटरमधून अमेरिकन व्यक्तीला त्याची समस्या सोडविण्याकरीता अंदाजे १०० यु एस डॉलर किंमतीचे आय ट्युन कार्ड विकत घेण्यास भाग पडत़ त्या आयट्युन कार्डचा नंबर त्यांच्याकडून घेत अमेरिकन नागरिकाने आयट्युन कार्ड नंबर यांना सांगितल्यानंतर ते त्याच ब्राऊझरवरील पॉपअॅप काढून टाकत असत़ हे कार्ड नंबर आदित्य काळे व रोहित माथूर एकत्रित करुन त्यांचा राजस्थान येथील साथीदारांचे व्हॉटसअॅप मोबाईल वर पाठवित असत़ हा साथीदार ते कार्ड क्रॅश करुन घेत व त्याचे कमिशन व्ही टेक स्क्वेअरच्या बँक खात्यावर जमा करीत असे़ सायबर सेलने त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अधिक तपासासाठी ३ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे़
पोलीस उपायुक्त सुधीर हिरमेठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पवार, संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, उपनिरीक्षक किरण औटे, सोनाली फटांगरे, राजकुमार जाबा, प्रसाद पोतदार, अनिल पुंडलिक, संतोष जाधव, नितेश जाधव, शिरीष गावडे, शुभांगी मालुसरे, शितल वानखेडे या पथकाने केली़
दीड हजार अमेरिकी नागरिकांना पाठविले होते मेसेज
रोहित माथूर हा आयटी इंजिनअर असून आदित्य काळे याने फॉरेन ट्रेडची पदवी घेतली आहे़ आॅगस्टपासून त्यांनी हे कॉल सेंटर सुरु केले होते़ त्यांच्या बँक खात्यावरुन अंदाज १७५ अमेरिकन नागरिकांची मिळून एकूण १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे़ कॉल सेंटरमधून ६ हार्डडिस्क, १ लॅपटॉप, वायफाय राऊटर, ५ हेडसेट जप्त करण्यात आले आहेत़ त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी आतापर्यंत अंदाजे दीड हजार अमेरिकन नागरिकांना पॉपअॅप पाठवून कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे़