पुणे : नागरिकांची ऑनलाईन व्यवहारांना पसंती वाढल्याने ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे देखील कमालीचे वाढले आहेत. अशा गुन्ह्यांमध्ये आराेपींना पकडने अवघड असल्याने नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागते. परंतु पुणे पाेलिसांच्या तत्परतेमुळे ऑनलाईन फसवणूक झालेल्या अनेक नागरिकांचे पैसे परत मिळण्यास मदत झाली आहे. 6 मे ते 12 मे 2018 या कालावधीत पुणे सायबर क्राईम विभागाकडे प्राप्त झालेल्या अर्जदारांचे सुमारे 1 लाख 29 हजार 182 रुपये रिफंड करण्यात आले आहेत.
अनेकदा नागरिकांनी फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला ओटीपी शेअर केला असेल तर अशा प्रकरणांमध्ये बॅंकेकडून ते पैसे परत केले जात नाहीत. हे पैसे विविध मर्चंट, विविध ऑनलाईन वाॅलेट मध्ये गेलेले असतात. अशावेळी सायबर सेल संबंधित मर्चंट, वाॅलेट यांना मेलद्वारे पत्रव्यवहार करुन अर्जदारांना त्यांची रक्कम परत करते. दुसऱ्या प्रकारात जर नागरिकांननी ओटीपी शेअर केला नसेल किंवा तक्रारदाराचे डेबीट किंवा क्रेडीट कार्ड त्याच्या ताब्यात असताना सुद्धा खात्यावरील रक्कम काढली गेली असेल तर अशावेळी सायबर सेलकडून संबंधित बॅंकेला पत्रव्यवहार केला जाताे. ठराविक काळानंतर बॅंकेकडून किंवा मर्चंट, ई- वाॅलेट कडून रक्कम नागरिकांना परत केली जाते.
विनीत परमार यांच्या क्रेडीट कार्डवरुन अनधिकृत व्यवहार करुन त्यांची 55 हजार 224 रुपयांची फसवणूक करण्यात आली हाेती. या प्रकरणामध्ये सायबर पाेलसांनी तात्काळ बॅंकेशी पत्रव्यवहार करुन त्यांची गेलेली रक्कम परत मिळवून देली. अशाच प्रकारे संदीप बेदी यांचे 38 हजार 927 रुपये त्यांना परत करण्यात आले. एका प्रकरणात नरहरी घावटे यांचे डेबीट कार्ड त्यांच्याजवळ असताना त्यांच्या कार्डवरुन अनधिकृत व्यवहार करुन त्यांची 28 हजार रुपयांची फसवणूक झाली हाेती. या प्रकरणातही सायबर पाेलिसांनी तत्परता दाखवत बॅंकेशी पत्रव्यवहार करुन घावटे यांना त्यांचे पैसै परत मिळवून दिले. तसेच सचिन खुराना यांनी ओएलएक्स वरुन टुव्हीलर घेण्यासाठी एका व्यक्तीला पेटीयमद्वारे 2 हजार 498 रुपये दिले हाेते. यात त्यांची फसवणूक झाली हाेती. याबाबतही पाेलिसांनी खुराना यांना रक्कम परत मिळवून दिली.
ही कामगिरी पाेलीस उपआयुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त निलेश माेरे, वरिष्ठ पाेलीस निरीक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम पाेलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.