पांडुरंग मरगजे
धनकवडी : पुण्याचे सायकलपटू ह्रदयरोग तंज्ञ डाॅ. ओंकार थोपटे यांनी लंडन-एडीनबर्ग-लंडन (LEL) ही १५४० किलोमीटरची अत्यंत कठीण अशी सायकल स्पर्धा केवळ १२८ तास २० मिनिटे या विक्रमी वेळेत पूर्ण करून इतिहास रचला. यंदा देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना त्यांच्या या विक्रमी कामगिरी मुळे अटके पार झेंडा फडकविणाऱ्या मराठ्यांच्या पराक्रमाची जणू पुनरावृत्ती झाली, अशी भावना मराठी मनात निर्माण झाली आहे.
जागतिक पातळीवर अत्यंत आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या लंडन-एडीनबर्ग-लंडन (LEL) ही १५४० किलोमीटरची खडतर सायकल स्पर्धा पद्मावती येथील डॉ. ओंकार थोपटे यांनी यशस्वी रित्यापूर्ण केली. ७ ते १२ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत भारतातील १५० सायकलपटूंनी सहभाग घेतला होता. त्यातील ११७ पटूंनी ही राईड पूर्ण केली. त्यामुध्ये डॉ. थोपटे आघाडीवर होते.
लंडन-एडीनबर्ग-लंडन ही सायकल स्पर्धा म्हणजे जणु पाच दिवसांचे युद्धच! कारण सहभाग घेणाऱ्या सायकलपटूला नाष्टा, जेवण, विश्रांती, कोठेही थांबता येत नाही, कारण सायकलपटूला पाच दिवस अहोरात्र सायकल चालवावी लागते. व्यवसायाने हृदयरोगतज्ज्ञ असणार्या डाॅ. ओंकार थोपटे यांनी त्यासाठी विविध नामांकित सायकल स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रचंड तयारी केली होती. त्यामुळेच डॉ. थोपटे यांना या स्पर्धेमध्ये मिळालेले यश म्हणजे त्यांची अफाट इच्छा शक्ती व प्रयत्नांचे फलित म्हणावे लागेल.
सायकलिंगमुळे आपण हृदयरोगाला दूर ठेवू शकतो
माझ्यासाठी लंडन-एडीनबर्ग-लंडन या सायकल स्पर्धेतील यश खूपच महत्वाचे होते. या स्पर्धेत केवळ सहभाग घेणे व स्वतःची क्षमता सिद्ध करणे इतका मर्यादित माझा हेतू नव्हता. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण जर सायकल चालवली तर आपल्या सर्वांचेच आरोग्य उत्तम राहील. नियमित सायकलिंगमुळे आपले हृदय निरोगी व कार्यक्षम राहून आपण हृदयरोगाला दूर ठेवू शकतो, हेच मला सांगायचे होते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून एकदा तरी सायकल चालवली पाहिजे. - डॉ. ओंकार थोपटे, हृदयरोगतज्ज्ञ