पांडुरंग मरगजे
धनकवडी : ऑडॅक्स क्लब पॅरिसियन आयोजित पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस २०२३ (पीबीपी) या जागतिक सायकल स्पर्धेत पुण्याच्या सायकलपटूंनी उत्तुंग यश मिळत फ्रान्समध्ये भारताचा डंका वाजवला आहे.
पॅरिसमध्ये झालेल्या रॅन्डोनिअर या स्वयंआधारित 1220 कि. मी. ब्रेव्हेट स्पर्धेत जगभरातून तब्बल आठ हजार तर भारत देशातून 280 सायकलपटू सहभागी झाले होते. यामध्ये पुण्याचे १४ सायकल स्वारांनी या स्पर्धेचे आव्हान स्वीकारले. ही 1220 किलोमीटरची सायकल स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 90 तासांचा कालावधी दिला जातो.
पुण्याचे अल्ट्रा सायकलपटू ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. ओंकार थोपटे यांनी ८९ तास २२ मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण करुन इतिहास रचला. लंडन एडिनबर्ग लंडन ही स्पर्धा २०२२ मध्ये आणि पीबीपी ही स्पर्धा २०२३ या लागोपाठ वर्षी पूर्ण केलेले ते एकमेव भारतीय डॉक्टर असून ही स्पर्धा कमालीची अवघड असून सुद्धा त्यांनी ती पूर्ण केली. ह्या स्पर्धेत अवघे ९० तास १२२० किमी पार करण्यात दिलेले असतात आणि डोंगरदर्यातून, घाटातून, विषम हवामानात रात्री थंडी, तर दिवसा प्रचंड ऊन, भारतीय खाण्याची गैरसोय, आणि अपुरी झोप या गोष्टींचा सामना करत ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. शेवटच्या दिवशी सायकलस्वारांना उलटे वारे आणि प्रचंड पाऊसाचा सामना करावा लागला. ट्रायएथलीट गगन ग्रोव्हर यांनी ही स्पर्धा ८६ तास १० मिनिटांत तर पुणे राण्डोनर्सच्या महिला सायक्लिस्ट अंजली भालिंगे यांनी ८८ तासात ही स्पर्धा पूर्ण करुन पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. सूरज मुंढे, किरीट कोकजे, संतोष बिजुर, अक्षय जोशी दिनेश मराठे यांनी दिलेल्या वेळेबाहेर ही स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेत पुण्याच्या महिला सायकलिस्ट डॉ. लीना पाटणकर यांनी ११०० कि.मी. अंतर पूर्ण केले. प्रचंड झोप येत असल्यामुळे ही स्पर्धा थोड्या अंतरासाठी सोडावी लागली. आशिष जोशी यांनी ब्रेस्टपासून पॅरिस पर्यंतचे अर्धे अंतर पार करून पुढच्या चेक पॉईंटला पोहोचल्यानंतर गुडघ्याची सूज वाढली व वेदना सहन न झाल्याने ही स्पर्धा सोडावी लागली.
चंद्रकांत बारबोले यांना मानेच्या प्रचंड दुखण्यामुळे ही स्पर्धा ८५० किमी अंतरावर सोडवी लागली. या अष्टपैलू सायकलपटूंनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले व भारताचा तिरंगा पॅरिसमध्ये अभिमानाने फडकवला. त्याबद्दल पुणे राण्डोनर्स च्या सदस्यांनी एकच जल्लोष केला. तसेच हा आनंद पुणे राण्डोनर्स च्या सदस्यांनी केक कापून व मिठाई वाटप करून साजरा केला.