पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात गुरुवारी पाऊस काहीसा कमी झाला असून दिवसभरात केवळ ९.४ मिमी पावसाची नोंद झाली. तर शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या चारही धरणांत मिळून १४.६८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या ५० टक्के आहे. तर जिल्ह्यातील धरणे ४० टक्के भरली आहेत.
शहर व जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा जोर ओसरला. शहरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९.४ मिमी पाऊस पडला. धरण परिसरातही पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग ४७०८ क्युसेक करण्यात आला आहे. हवामान विभागाने शुक्रवारी जिल्ह्यातील घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस पाऊस कमी होण्याची शक्यता असून घाट परिसरात मुसळधार पाऊस पडेल. तर सोमवारी पावसात आणखी घट होऊन मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये ७८.३१ टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून एकूण क्षमतेच्या हा साठा ३९.४८ टक्के झाला आहे. त्यात कळमोडी व आंद्रा ही धरणे पूर्ण भरली आहेत.