प्रसाद कानडे
पुणे: पुणे - दौंड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण झाल्याने हे ७५ किमीचे अंतर कापण्यासाठी गाड्यांना ७० मिनिटे ते २ तासांचा वेळ लागत आहे. रेल्वेने अनेक गाड्यांचे लूज मार्जिन (गाडीला उशीर झाल्यास मेकअप करण्यासाठीची राखीव वेळ ) जुन्या वेळापत्रकाचेच ठेवले आहे. त्यामुळे अनेक गाड्यांचा हा प्रवास रेंगाळत आहे. दौड स्थानकाजवळ आता कॉडलाइन देखील आहे. त्यामुळे लोको शंटिंगचा देखील प्रश्न बऱ्याचअंशी मिटला आहे. जवळपास १५ रेल्वेला लूज मार्जिन मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ह्या गाड्यांचा प्रवास रेंगाळत आहे, तर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लोणावळा - पुणे - दौंड हा पुणे रेल्वे विभागातील सर्वांत महत्त्वाचा सेक्शन. देशातील सुवर्ण चतुष्कोण मार्गात ह्याचा समावेश होतो. त्यामुळे खूप आधीच ह्या मार्गावर दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले. मात्र, आजही अनेक गाड्यांना लूज मार्जिन दिल्याने प्रवाशांना याचा फायदा होताना दिसून येत नाही. रेल्वे प्रवास जर रेंगाळणारा असेल तर दुहेरीकरण व विद्युतीकरणाचा फायदा काय असा सवाल आता प्रवासी उपस्थित करत आहेत.
रेल्वे गाड्या प्रवासाचा वेळ ( दौंड- पुणे )
राजकोट व पोरबंदर एक्स्प्रेस २ तासमुंबई मेल एक्स्प्रेस १ तास १० मिनिटेदादर सेंट्रल ८३ मिनिटेसिद्धेश्वर एक्स्प्रेस ७० मिनिटेपुणे-सोलापूर डेमू १०० मिनिटेपनवेल एक्स्प्रेस ८० मिनिटेहैद्राबाद - मुंबई एक्स्प्रेस १ तास ५५ मिनिटेकुर्ला एक्स्प्रेस १ तास २० मिनिटेउद्यान एक्स्प्रेस १ तास २५ मिनिटेकोणार्क एक्स्प्रेस २ तास
''लूज मार्जिनमुळे जर गतिमान प्रवासाला ब्रेक लागत असेल तर ते चुकीचे आहे. लूज मार्जिनचा वेळ कमी झाला पाहिजे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक संपर्क साधून त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल असे निखिल काची (विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य, पुणे) यांनी सांगितले.''
''काही तांत्रिक कारणांमुळे रेल्वेला लूज मार्जिन ठेवा लागतो. शिवाय प्रत्येक सेक्शनमध्ये वेगवेगळ्या गाड्यांना देण्यात आलेली वेग मर्यादा या सर्वांचा विचार करूनच लूज मार्जिन दिलेले असते असे मनोज झंवर (जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे) यांनी सांगितले आहे.''