पुणे : दौंड-पुणे रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणाचे काम जूनपर्यंत पूर्ण होणार आहे; त्यामुळे लवकरच तळेगाव ते दौंड या मार्गावर लोकल धावेल, असे संकेत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी पुण्यात दिले. पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म १, २ आणि ३ ला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा लवकरच पुनर्विकास करणार असून, त्यासाठी राज्य शासनाची अंतिम मान्यता बाकी असल्याचे ते म्हणाले. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, संजय पाटील, रेल्वेचे पुणे विभागप्रमुख बी. के. दादाभॉय या वेळी उपस्थित होते. प्रभू म्हणाले, की रेल्वे हा देशाचा कणा आहे. रेल्वेचा विकास झाल्यास देशाचा विकास वेगाने होईल. गेल्या २० वर्षांत रेल्वेत पुरेशी गुंतवणूक न झाल्याने प्रवाशांना सोयीसुविधाही मिळणे कठीण झाल्याने देशात पहिल्यांदाच एकाच वर्षी रेल्वेत तब्बल ४७ टक्के गुंतवणूक करण्यात आली आहे. पुणे- दौड लोकलसाठी विद्युतीकरण आणि नवीन लाईनसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. हे काम जूनअखेरपर्यंत पूर्ण होणार असून, त्यामुळे दौंड ते लोणावळा या मार्गावर लोकल सुरू केली जाईल. रेल्वेमधील निविदा प्रक्रिया आणि नोकरभरतीप्रक्रिया यापुढे पारदर्शक असावी, यासाठी ती आॅनलाईन पद्धतीने करण्यात येईल, असे प्रभू यांनी सांगितले. निविदा आणि भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात दलालांची संख्या वाढली असल्याने त्यांना लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. याशिवाय, रेल्वे स्थानकांत बेस किचन सुरू करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
पुणे-दौंड मार्गाचे विद्युतीकरण जूनपर्यंत
By admin | Published: April 03, 2016 3:52 AM