Pune: दिवसाढवळ्या खून, महिलांवरील अत्याचार; पुण्यासह राज्याची देशात बदनामी, काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 05:24 PM2024-09-04T17:24:05+5:302024-09-04T17:24:29+5:30

सरकारचा पोलीस, प्रशासन यांच्यावर कसलाही वचक राहिलेला नाही

Pune Daylight murders violence against women Defamation of the state including Pune in the country, criticism of the Congress | Pune: दिवसाढवळ्या खून, महिलांवरील अत्याचार; पुण्यासह राज्याची देशात बदनामी, काँग्रेसची टीका

Pune: दिवसाढवळ्या खून, महिलांवरील अत्याचार; पुण्यासह राज्याची देशात बदनामी, काँग्रेसची टीका

पुणे: राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. सरकारला त्यावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पुण्यासह राज्याची देशात बदनामी होत आहे अशा शब्दात काँग्रेसने राज्यातील महायुती सरकारला लक्ष्य केले.

पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघांची आढावा बैठक घेण्यासाठी पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, प्रुथ्वीराज चव्हाण,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते बुधवारी पुण्यात आले होते. काँग्रेस भवनमध्ये शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले. बैठकीपूर्वी पत्रकारांबरोबर बोलताना चेन्नीथला, वडेट्टीवार,पटोले यांनी महायुती सरकारला लक्ष्य करीत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.

राज्यात कायदा, सुव्यवस्था नावालाही शिल्लक राहिलेली नाही. दिवसाढवळ्या खून होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत. अशा घटनांमधील गुन्हेगार खुले आम फिरत आहेत. या सर्व दुरवस्थाला सरकारच जबाबदार आहे असे चेन्नीथला म्हणाले. सरकारचा पोलीस, प्रशासन यांच्यावर कसलाही वचक राहिलेला नाही. त्यातूनच असे प्रकार होत आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.

वडेट्टीवार व पटोले यांनी हे सरकार फक्त वसुली सरकार आहे असा आरोप केला. महिला अत्याचार,मालवणातील शिवछत्रपतींचा पुतळा पडला. याविरोधात आम्हाला आंदोलन करायला बंदी घातली. दुसरीकडे सर्व गुन्हे प्रकरणातील आरोपी मोकळे फिरत आहेत. ही स्थिती राज्यात कधीही नव्हती असे पटोले म्हणाले.
सर्व यंत्रणा जवळ असताना सरकारमधील पक्षच आंदोलन करतात असेही राज्यात कधी नव्हते. सरकारला फक्त पैसा कसा व कशातून मिळेल हेच पडले आहे. मागील ७ वर्षात निघाले नसतील इतक्या निविदा या सरकारने मागील २ वर्षात काढल्या असे पटोले म्हणाले.

चेन्नीथला यांनी आम्ही पक्ष संघटन वाढवण्यावर भर देत आहोत अशी माहिती दिली. सरकारचे अपयश जनतेपर्यत पोहचवण्याला आम्ही प्राधान्य दिले आहे. थेट तळापर्यंत जाऊन काम करण्याबाबत पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत असे ते म्हणाले.

खासदार प्रणिती शिंदे, आमदार संग्राम थोपटे, रविंद्र धंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आबा बागूल, सरचिटणीस अँड.अभय छाजेड, चिटणीस संजय बालगुडे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी,कमल व्यवहारे,संगिता तिवारी यावेळी उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी बैठकीसाठी आले होते. पटोले, वडेट्टीवार यांनी त्यांच्या जिल्हा व शहरनिहाय बैठका घेतल्या वत्यांच्या मतदार संघातील पक्षाच्या कामाविषयी सुचना दिल्या.

Web Title: Pune Daylight murders violence against women Defamation of the state including Pune in the country, criticism of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.