पुणे : आठवर्षीय पीडितेची आई फितुर झाली; पण पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या नात्यातील २४ वर्षीय तरुणाला ५ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी सुनावली. दंड न भरल्यास त्याला एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.
ही घटना १८ जुलै २०२१ रोजी चतु:श्रृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. फिर्यादी किराणा दुकान चालविते. घटनेच्या दिवशी तिला भावजयने फोन करून दुकानातून घरी बोलावून घेतले. त्यानंतर आरोपीने घरात बोलावून अल्पवयीन मुलीशी लैंगिक छळ केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे पीडितेच्या आईनेच याबाबत पोलिसात फिर्याद दिली. नंतर तीच फितुर झाली.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभुते आणि शुभांगी देशमुख यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक सविता भागवत आणि संतोष कोळी यांनी या प्रकरणाचा तपास केला. न्यायालय कामकाजासाठी पोलीस उपनिरीक्षक रेणूसे, हवालदार तुपसुंदर आणि शिपाई पुकाळे यांनी मदत केली.