नम्रता फडणीसपुणे : गोव्यात आजपासून (दि. २०) रंगणाºया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (इफ्फी) पुण्यातील दिग्दर्शक नितीन सुपेकर यांच्या ‘बडे अब्बू’ चित्रपटाची निवड झाली आहे. ‘इफ्फी’मध्ये गोवन स्टोरीज या विशेष विभागात या चित्रपटाचे सादरीकरण होणार आहे. अनेक वर्षांपासूनचे ‘इफ्फी’मध्ये सहभागी होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या दिग्दर्शकाला या चित्रपटाने जणू ‘रेड कार्पेट’चाच फील दिला आहे. ‘माऊस’ या दिवाळी अंकातील लेखिका हिना कौसरखान यांच्या मूळ कथेवरून प्रेरणा घेत हा चित्रपट निर्मित केला आहे, हे त्यातील विशेष! ‘लोकमत’शी बोलताना लेखक-दिग्दर्शक नितीन सुपेकर म्हणाले, ‘‘हा गोव्यातील कोकणी भाषेतला चित्रपट आहे. एका ट्रकड्रायव्हरभोवती चित्रपटाचे कथानक गुंफले आहे. मुस्लिम कुटुंबातील या ट्रकड्रायव्हरकडे हा पिढीजात व्यवसाय आला आहे. त्या ट्रकचेच नाव ‘बडे अब्बू’ असे आहे. या व्यवसायाबाबत त्याला फारशी आपुलकी नाही; पण परंपरा म्हणून नाइलाजाने त्याला तो करावा लागत आहे, ही कथानकाची ढोबळ मांडणी. हिना कौसरखान यांची एक कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. माझा मित्र किशोर शिंदे यांनी त्यावर शॉर्ट फिल्म किंवा लघुपट करावा म्हणून मला ही कथा पाठवली. ती कथा वाचल्यानंतर त्यामधून अनेक पात्रे आणि घटना सुचत गेल्या. या मूळ कथेचा बाज शॉर्ट फिल्मसारखाच होता. पण मुळातच शॉर्ट फिल्म करायची झाली, तर तिचा जीव खूपच लहान असतो. जे मांडायची इच्छा आहे ते फारसे मांडता येत नाही. काही गोष्टी अशा असतात, की त्या कथेच्या पलीकडे जाऊनच मांडाव्या लागतात. मुस्लिम असल्यामुळे ट्रकड्रायव्हरचे सामाजिक नि मानसिक खच्चीकरण, त्याला मिळणारी वागणूक, १८-१८ तास कुटुंबापासून दूर राहावे लागणे, त्याची परवड असे छोटे-छोटे मुद्दे मांडले आहेत. याशिवाय लहान मुलींची दुबई, इराकमध्ये लग्न करून दिली जातात. त्याची मुलगी कशी ट्रॅक होते, अशा एका वेगळ्या दृष्टिकोनातून कथानकाचा विचार केला आहे. हा चित्रपट ३२ दिवसांमध्ये शूट केला असून, कोकणी व हिंदी अशा दोन भाषांत निर्मित केला आहे. झारखंडच्या चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविला. त्यामध्ये या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनेता व उत्कृष्ट एडिटर असे चार पुरस्कार मिळाले आहेत. राजेश शर्मा हा चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत असून, श्यामराव यादव व शांती बोरकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
...........दिवाळी अंकातील माझ्या कथेवर चित्रपट निर्मित करण्यासंबंधी दिग्दर्शकांनी मला विचारले होते. पण, माझी कथा ही लहान मुलांचे भावविश्व उलगडणारी आहे. या चित्रपटात त्यांनी काही स्वातंत्र्य घेतले आहे. त्यामुळे माझ्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे, असे म्हणता येणार नाही. केवळ कथेवरून प्रेरणा घेतली, असे म्हणता येईल.- हिना कौसरखान, लेखिका
‘इफ्फी’मध्ये सहभागी होण्याची खूप वर्षांपासून इच्छा होती; पण काही कारणांमुळे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आता इफ्फीमध्ये चित्रपटाची निवड झाल्यामुळे अनेक वर्षांचे अपूर्ण स्वप्न आज पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे.- नितीन सुपेकर, दिग्दर्शक, ‘बडेअब्बू’