पुणे : जिल्ह्यात १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ६० वर्षे वयावरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तिसरा डोस देण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी जिल्ह्यात २५०० ज्येष्ठ नागरिकांनी लसीची दक्षता मात्रा (प्रिक्रॉशन डोस) घेतला. पहिल्या दिवशी ३३६६ आरोग्य कर्मचारी आणि ७७४ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी तिसरा डोस घेतला.
कोरोनाची तिसरी लाट आणि ओमायक्रॉनचे संकट यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटाचे लसीकरण सुरू करण्यात आले. तसेच, १० जानेवारीपासून तिसऱ्या डोसला सुरुवात करण्यात आली. दुसरा डोस घेऊन ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी कोविन अँपवरून नोंदणी करून किंवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लसीचा तिसरा डोस घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहरात पहिल्या दिवशी दुसरा डोस घेऊन ९ महिने पूर्ण झालेले ३८७ आरोग्य कर्मचारी, १९० अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी 190 आणि ८०० ज्येष्ठ नागरिकांनी तिसरा डोस घेतला. पुणे महापालिकेने १७९ केंद्रांवर या विशेष गटासाठी लसीकरणाचे नियोजन केले आहे. सुमारे पाच ते सहा हजारांपेक्षा जास्त लसींचा कोटाही तयार ठेवण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ११ लाख ५६ हजार ६५१ ज्येष्ठ नागरिकांनी पहिला डोस, तर ९ लाख ३६ हजार ८४९ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. ३ ते १० जानेवारीदरम्यान १५ ते १८ वयोगटातील १ लाख ९८ हजार ८५९ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे.
''साठ वर्षांवरील सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक कोविन अँपवर नोंदणी करून किंवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन तिसरा डोस घेऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने डोस घ्यावा, असे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, डोस घेण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही. दुसरा डोस घेऊन ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच तिसरा डोस दिला जाणार आहे असे राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले.''
जिल्ह्याची आकडेवारी
आरोग्य कर्मचारी पहिला डोस - १,५७,६७५दुसरा डोस - १,४२,६७९
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीपहिला डोस - २,५२,५४४दुसरा डोस - २,३४,७००
१८ ते ४४ वर्षे वयोगटपहिला डोस - ५६,१७,७४७दुसरा डोस - ३९,८६,४७५
४५ ते ५९ वयोगटपहिला डोस - १७,०८,२७४दुसरा डोस - १३,७८,३२२
६० वर्षेवरील नागरिकपहिला डोस - ११,५६,६५१दुसरा डोस - ९,३६,८४९