पुणे : आर्थिक सक्षमता आणि शेती व शेती आधारित उद्योगांसाठी केलेल्या कामकाजाचा विचार करून त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान विचारात घेऊन राज्य शासनाकडून सन २०१६ चा ‘सहकार भूषण’ पुरस्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेस राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच पुरस्कारप्राप्त सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा बॅँकेला मिळालेला ‘सहकार भूषण’ हा पुरस्कार बॅँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्षा अर्चना घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजयकुमार भोसले यांनी स्वीकारला. याप्रसंगी राज्यातील इतर संस्थांनासुद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुणे जिल्हा बॅँकेच्या ठेवी ८ हजार कोटींच्यावर असून, बॅँकेचे भागभांडवल २७० कोटी आहे. तर एकूण ५८ टक्के वसुली झाली आहे. त्याचबरोबर बॅँकेचे कर्जवाटप ५ हजार कोटींच्या पुढे गेलेले असून, एकूण उलाढाल १३ हजार कोटींची आहे. सन २०१६-१७ चा निव्वळ नफा ७० कोटी असल्याचे बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्ष अर्चना घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार भोसले यांनी सांगितले.
पुणे जिल्हा बॅँकेस ‘सहकार भूषण’ पुरस्कार
By admin | Published: April 28, 2017 5:44 AM