PDCC Election: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अजित पवारांचा अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 06:56 PM2021-12-02T18:56:52+5:302021-12-02T19:27:44+5:30
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री पवार यांचा देखील अर्ज दाखल करण्यात आला आहे
बारामती : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गुरुवारी ‘अ’ वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकताच या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री पवार यांचा देखील अर्ज दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा बँकेचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सुरवात झाली आहे. ‘अ’ वर्ग मतदारसंघातून बारामती तालुका प्रतिनिधीकरीता उपमुख्यमंत्री पवार यांच्या वतीने दोन अर्ज दाखल केले आहेत. प्रमुख नेतेमंडळींचे अर्ज दाखल झाल्याने आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. पहिल्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सतीश हरिभाऊ तावरे, अनुमोदक म्हणून दिपक मलगुंडे दुस-या उमेदवारी अर्जावर अमोल गावडे यांनी सूचक तर लालासाहेब नलवडे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. या वेळी बारामती नगरपरीषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, नगरसेवक सुधीर पानसरे आदी उपस्थित होते.
अजित पवार यांचे बँकेवर निर्विवाद वर्चस्व
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बँकेवर निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे नविन कारभारी निवडताना पवार यांचा शब्द अंतिम असणार आहे. बँकेवर संचालक पदी संधी दे्ण्याबाबत पवार हेच निर्णय घेणार आहेत. पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात या बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा संभाळली आहे. त्यामुळे या बँकेशी त्यांचे भावनिक नाते आहे. शिवाय सात वेळा पवार यांनी बँकेचे चेअरमन पद भुषविले आहे. सन १९९१ पासून पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून निवडून गेलेले आहेत. या मतदारसंघात १९५ मतदार आहेत. राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे.